Sunday 27 September 2015

लालबागचा राजा - महिला पत्रकाराला पोलिसांकडून मारहाण

लालबागच्या राजाच्या दर्शनाला लागलेल्या रांगेचे मोबाईलवरून चित्रीकरण करणार्‍या महिला पत्रकाराला पोलिसांनी धक्काबुक्की करून पोलीस चौकीत डांबून ठेवल्याची घटना शुक्रवारी (25 Sep. 2015) रात्री घडली.

या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंद करून घेण्यासही नकार दिल्याचे सांगण्यात येते.पूनम अपराज असे महिला पत्रकाराचे नाव असून शुक्रवारी रात्री लालबागचा राजाच्या दर्शनासाठी लागलेल्या रांगेत पोलीस कर्मचारी त्यांच्या सहकार्‍यांना रांगेत घुसवत होते, तर गणेशभक्तांना अटकाव करीत होते. हे दृश्य मोबाईलवरून पूनम अपराज या चित्रीत करीत होत्या. त्या वेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी अपराज यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर अपराज यांना लालबागच्या पोलीस चौकीत नेऊन डांबून ठेवले. त्यांच्याकडून १२00 रुपये दंड वसूल करून त्यांची सुटका केल्याचा आरोप अपराज यांनी केला आहे.

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या येथे पूनम अपराज या महिला पत्रकाराला झालेली मारहाण हा काही पहिला प्रकार नाही. या आधीही पत्रकारांना धक्काबुक्की झाली आहे. या धक्काबुक्की नंतर पत्रकारांनी लालबागच्या राजाकडे पाठ फिरवली होती. परंतू पुन्हा यावर्षी लालबागचा राजा मंडळाने वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांना पैसे देवून (पेड न्यूज) आपली प्रसिद्धी करून घेतली आहे.  पत्रकारांना मारहाण होत आहे. वाईट वागणूक दिली जात आहे. असे होत असताना इतर पत्रकारांनी, वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांनी पैशांच्या मागे किती पळावे याचा विचार 
करण्याची गरज आहे.