Sunday 27 April 2014

वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला मारहाण

मुंबई : वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला मालाड येथे एका टोळक्याने मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी दुपारी मालाड (प.) येथे घडला. या प्रकरणी मालाड पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
'जिया' या वृत्तवाहिनीचे वरिष्ठ पत्रकार संजय प्रसाद हे शनिवारी दुपारी पत्नीसोबत खरेदी करण्यासाठी मालाड (प.) येथील साईनाथ मार्केट येथे गेले होते. दरम्यान, खरेदी करीत असताना तेथील काही फेरीवाल्यांनी प्रसाद यांच्या पत्नीला टोमणा मारल्यामुळे संजय प्रसाद यांनी त्यांना जाब विचारला असता पाच जे सहा जणांच्या टोळक्याने संजय प्रसाद यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. संजय यांच्या पत्नी बचावासाठी पुढे आल्या असता या टोळीतील एकाने त्यांनाही धक्काबुक्की करून त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. जखमी संजय प्रसाद यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात येऊन मालाड पोलिसांनी पाच ते सहा जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अमर बहादूर नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, तर चार जणांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले आहे. यातील एका आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.