Sunday 20 July 2014

पत्रकार संरक्षण कायद्याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊ - उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकारांवर होत असलेले हल्ले चुकीचे आहेत असे म्हटले आहे. दादा एवढ्यावरच थांबले नाहीत तर पत्रकार संरक्षण कायद्याबाबतचा आपण मुंबईस गेल्यावर तातडीने मुख्यमंत्र्याशी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा घडवून आणू आणि धोरणात्मक आणि सकारात्मक निर्णय घेऊ असा शब्द शनिवारी दादांनी सातारा येथे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीनं आयोजित कार्यक्रमात बोलताना दिला. एवढेच नव्हे दादा आज साताऱ्यात पत्रकारांवर एवढे मेहरबान होते की, त्यांनी साताऱ्यात सुसज्ज आणि भव्य पत्रकार भवन उभारण्यासाठी आपण प्रय़त्न करू असेही आश्वासन दिले आहे. 

अधिस्वीकृती समिती अस्तित्वात नाही त्याबाबत देखील माहिती आणि जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असेही पवार यांनी स्पष्ट केले.हरियाणा तसेच अन्य राज्यातील पत्रकारांसाठी ज्या योजना तेथील सरकारानी राबविल्या आहेत त्या मागवून घेऊ आणि त्यावर चर्चा करू असे आश्वासन त्यांनी दिले.एकूण काय आज साताऱ्यात पत्रकारांनी जे जे मागितले ते ते देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.अजित पवारांनी पत्रकारांच्या मागण्यांबद्दल पहिल्यांदाच एवढी सकारात्मक भूमिका दाखविली आहे.