Monday 18 August 2014

राज ठाकरे यांची माध्यमांवर आगपाखड

मनसेची ब्ल्यू प्रिंट कधी जाहीर होणार याच्या तारखा परस्पर जाहीर केल्या जात आहेत. पंचतारांकित हॉटेलमध्ये होणाऱ्या ब्ल्यू प्रिंटच्या उद्घाटनाला रतन टाटा आणि मुकेश अंबानी येणार असेही सांगितले जात आहे... परंतु, ना मला त्याची कल्पना आहे ना रतन टाटांना ना आंबानी यांना. सोशल मिडियावर कुणी काही पुडी सोडतो आणि त्याच्या बातम्या केल्या जातात. ब्ल्यू प्रिंट झाली की मी जाहीर करेन. त्यासाठी दारावर सारखी टकटक कशाला असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी माध्यमांवर आगपाखड केली.  

मिफ्ता नाटक-चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन रविवारी डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. व्हॉटस अॅपसारख्या सोशल मिडियावर राजकारण्यांनी अवंलबून राहू नये, असे मी एका कार्यक्रमात म्हणालो आणि मोदींवरचा व्हॉटसअॅपवर फिरत असलेला विनोद सांगितला, तर माध्यमांनी मोदींचा करिष्मा संपला, अशा बातम्या पसरवल्या. ब्ल्यू प्रिंट ऑगस्टमध्ये सादर करेन म्हटले तर लगेच कुणी तरी ९ ऑगस्ट तारीख जाहीर केली. चॅनलवाले व्हॉटसअॅपच्या आधारावर बातम्या पसरवितात. सोशल मिडिया हा चांगला आहे तितकाच त्रासदायक आहे. कुणाला काय वाटेल ते टाकून मोकळे होतात. विरंगुळा म्हणून तो ठीक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.