Monday 20 April 2015

'वाचकांच्या वृत्तपत्रावरील श्रद्धेशी प्रतारणा करू नये ' - भारतकुमार राऊत

मुंबई - वाचक हा छोट्या वृत्तपत्रांवर श्रद्धा बाळगतो. त्यावर निष्ठा ठेवतो. त्यामुळे वाचकांच्या श्रद्धेशी प्रतारणा करू नका, असे आवाहन माजी खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांनी "मावळ मराठा‘ साप्ताहिकाच्या वर्धापन दिनी व्यक्त केले. "सकाळ‘च्या सहयोगी संपादक मृणालिनी नानिवडेकर यांचा "मावळ मराठा‘ पुरस्काराने या वेळी सन्मान करण्यात आला. 

मावळ मराठा साप्ताहिकाचा 11 वा वर्धापनदिन रविवारी (ता. 19) मुंबई मराठी पत्रकार संघात साजरा झाला. या वेळी राऊत यांच्या हस्ते नानिवडेकर यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. या वेळी राऊत म्हणाले की, केवळ मोठी वृत्तपत्रे गुणवत्ता राखून आहेत, असे नाही तर छोटी वृत्तपत्रेही पत्रकारितेची गुणवत्ता जतन करीत आहेत. कमी पृष्ठे असूनही दर्जा आणि गुणवत्ता टिकवल्याबद्दल त्यांनी मावळ मराठा साप्ताहिकाचा गौरव केला. पत्रकारितेवर हल्ले होत असताना छोटी वृत्तपत्रे त्याला तोंड देत आहेत, ही बाबही त्यांनी नमूद केली.

राजकीय पत्रकारिता करताना पत्रकारितेत वेगळेपण जपल्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार सोमनाथ पाटील यांनीही या साप्ताहिकाबद्दल गौरवोद्‌गार काढले. हा पुरस्कार मला पत्रकारितेत अधिक चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देत राहील, अशी भावना नानिवडेकर यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली. ज्येष्ठ पत्रकार अजय वैद्य यांनीही मावळ मराठाला शुभेच्छा दिल्या. या वेळी शशिकांत पेंढारकर, अनुश्री माळगावकर, अण्णासाहेब पुळये आदी उपस्थित होते.

दैनिक सकाळ मधून साभार