Monday 20 July 2015

महिला पत्रकाराचा विनयभंग करणार्‍या रिक्षाचालकाला अटक

मुंबई : एका महिला पत्रकाराचा कथितपणे विनयभंग करणार्‍या ४0 वर्षीय रिक्षाचालकाला रविवारी अटक करण्यात आली. आरोपी रमेश कुमार त्रिलोदर याला विनोबा भावेनगर पोलीस ठाण्याच्या एका पथकाने कुर्ला येथून ताब्यात घेतले. 


महिला पत्रकाराच्या विनयभंगाची घटना मंगळवारी घडली होती. या २२ वर्षीय महिला पत्रकाराने शनिवारी एका अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध आपला आणि आपल्या मैत्रिणीचा विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी सांगितले की, सीसीटीव्ही कॅमेरा रेकॉर्डिंगमधून आरोपीची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी रिक्षा युनियन आणि विभागीय परिवहन कार्यालयाच्या मदतीने आरोपीला अटक केली. त्रिलोदर याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि मोटर वाहन अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.