Sunday 13 July 2014

बांदल यांनी गुन्हे पत्रकारितेला प्रतिष्ठा मिळवून दिली

BOOK RELEASE NO 044
आत्तापर्यंत माझ्यासारखे पत्रकार क्रीडा, गुन्हे पत्रकारिता ही कमी दर्जाची मानत आले आहेत. मात्र राजकीय, आर्थिक विषयांसोबतच गुन्हे पत्रकारितेची व्याप्तीही मोठी आहे, हे विजयकुमार बांदल यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी गुन्हे पत्रकारितेला प्रतिष्ठा मिळवून दिली असून मराठी पत्रकारितेत ही एक मोठी देणगी असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ पत्रकार व दैनिक ‘पुण्यनगरी’चे सल्लागार संपादक राधाकृष्ण नार्वेकर यांनी काढले. 

ज्ञानशक्ती मंच आणि ‘आपला चौथा स्तंभ’च्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार बांदल लिखित ‘गेम थरारक सत्य’ पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झाले, त्या वेळी ते बोलत होते. या प्रकाशन समारंभाला ‘प्रहार’चे संपादक महेश म्हात्रे, ‘लोकमत’चे संपादक विनायक पात्रुडकर, ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पवार, अ‍ॅड. प्रीती बने आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. नार्वेकर पुढे म्हणाले की, ‘बांदल यांनी पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहातून एका बाजूला पडलेली गुन्हे पत्रकारिता मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. गुन्हे क्षेत्रात धोके जास्त आहेत याची माहिती नवोदित पत्रकारांना मिळण्यासाठी त्यांचे हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार असल्याचे ते म्हणाले.


बांदल यांची मांडणी दिशादर्शक - महेश म्हात्रे
या कार्यक्रमाला प्रमख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ‘प्रहार’चे संपादक महेश म्हात्रे म्हणाले की, ‘आज पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर बांदल यांनी एका वेगळय़ाच विषयावर पुस्तकाची केलेली मांडणी ही दिशादर्शक ठरणार आहे. मी ‘गुन्हे’ या विषयापासून नेहमीच दूर राहिलो, तो खलिस्तान चळवळीचा काळ होता. त्या वेळी पत्रकारितेत बांदल यांच्या प्रेरणेने मी लिहिण्याचा प्रयत्न केला.
बांदल यांनी ज्या प्रकारे मार्गदर्शन केले त्याचा पत्रकारितेच्या पुढच्या प्रवासात फायदा झाला. बातमीदारी कशा प्रकारे केली पाहिजे हे मी कोणत्याही प्रकारची पदवी न घेता शिकलो आहे. यासाठी बांदल यांच्यासह राधाकृष्ण नार्वेकर, सोमनाथ पाटील, मिलिंद गाडगीळ, प्रभाकर नेवगी, नारायण पेडणेकर, शिवाजी धुरी यांच्याकडून वेगवेगळय़ा प्रकारचे शिक्षण मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
भारत आर्थिक महासत्ता होण्याचे स्वप्न आपण पाहत असलो तरी रंगराजन समितीने दिलेल्या अहवालानुसार देशात ३० टक्के लोक दारिद्रय़रेषेखालील जीवन जगत आहेत. हॉवर्ड विद्यापीठाच्या अहवालानुसार आपल्या देशातील ५० टक्के लोक दारिद्रयरेषेखाली जीवन जगत आहेत. एकीकडे कोटय़वधी रुपयांच्या घरात राहणारे श्रीमंत तर दुसरीकडे विपन्नावस्थेत जगणारे कोटय़वधी लोक इथे असल्याने पत्रकारितेच्या क्षेत्रात सर्व स्तरातील मुले आल्यास एकूणच समाजात ज्ञान आणि प्रबोधनाचा प्रसार होईल, असे मत म्हात्रे यांनी व्यक्त केले.
या वेळी ‘लोकमत’चे संपादक विनायक पात्रुडकर यांनी ‘पत्रकार म्हणून बांदल यांनी पाळलेली शिस्त आणि बारीक सारीक गोष्टी आजच्या पत्रकारांनी समजून घेण्याचे आवाहन केले’, तर प्रभाकर पवार यांनी बांदल यांचे हे पुस्तक थरारक असल्याचे या वेळी सांगितले. या वेळी प्रेक्षकांत संजय भिडे, नीलम वैद्य यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. ( दैनिक प्रहार मधून साभार )