Tuesday 15 July 2014

पालिका पत्रकार कक्षात भुरट्या पत्रकार आणि उंदरांचा सुळसुळाट

मुंबई महानगर पालिकेचे वृत्तसंकलन करण्यासाठी येणाऱ्या पत्रकारांच्या सोयीसाठी बनवण्यात आलेल्या पत्रकार कक्षात भुरट्या पत्रकारां बरोबर आता उंदरांचाही सुळसुळाट झाला असल्याने पत्रकारांच्या सुरक्षेचा आणि पत्रकार कक्षाच्या स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे भुरट्या पत्रकार आणि उंदरांचा ताबडतोब  बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या मुख्यालयात पालिकेचे वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांसाठी पत्रकार कक्ष बनवण्यात आला आहे. या पत्रकार कक्षामध्ये वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांचा दिवसभर वावर असतो. तसाच भुरट्या पत्रकारांचा सुद्धा वावर असतो. पालिकेच्या पत्रकार कक्षामध्ये वातानुकुलीत आणि बिगर वातानुकुलीत असे दोन भाग करण्यात आले आहेत. या वातानुकुलीत विभागाचा वापर स्वताला मोठ्या पेपरचे समजणारे पत्रकार आणि काही भुरटे पत्रकार मोठ्या प्रमाणात करतात.

वातानुकुलीत विभागाचा वापर करणाऱ्या पैकी काही पत्रकार आणि काही स्वताला पत्रकार म्हणवणारे भुरटे लोक आपले जेवण झाल्यावर जेवणाचे ताट व ताटातील खरकटे असेच पत्रकार कक्षामध्ये उघड्यावर टाकून निघून जात असल्याने उघड्यावर टाकलेले खरकटे खाण्यासाठी उंदीर येवू लागले आहेत. हळू हळू या उंदरांच्या संखेमध्ये वाढ होऊन आता उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे काही महिला पत्रकारांना उंदरांच्या भीतीने वातानुकुलीत कक्षाला रामराम ठोकून बाहेर सामान्य पत्रकारांबरोबर बसून काम करावे लागत आहे.

पत्रकार कक्षामध्ये उंदरांचा सुळसुळाट झाला असल्याने बहुतेक महिला पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण मिर्माण झाले आहे. उंदरांमुळे पत्रकार कक्षाच्या स्वच्छतेचा आणि पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला असल्याने उंदरांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी होत असतानाच पत्रकार कक्षामध्ये येणाऱ्या भुरट्या पत्रकारांचाही बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली आहे.