Thursday 11 December 2014

पत्रकारांना देण्यात येणार्‍या 'सर्मथन मानवी हक्क वार्ता पुरस्कारा'ची घोषणा

'सर्मथन' या मानवी हक्कांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेतर्फे प्रतिवर्षी राज्यातील मानवी हक्कांसाठी कार्यरत असलेल्या मुद्रित माध्यम तसेच वृत्तवाहिन्यांमध्ये पत्रकरिता करणार्‍या पत्रकारांना देण्यात येणार्‍या 'सर्मथन मानवी हक्क वार्ता पुरस्कारा'ची घोषणा सर्मथनचे कार्याध्यक्ष विवेक पंडित यांनी केली. 

या वर्षी मुद्रित माध्यमातून वैजनाथ खडसे (दै. सकाळ, यवतमाळ), जालिंदर शिंदे (दै. पुण्य नगरी, दै. केसरी व दै. पुढारी, सांगली) यांना तर दृक्श्राव्य माध्यमातून महेंद्र जोंधळे (टीव्ही ९, लातूर), मीलनसिंह लिव्हारे (टीव्ही ९, गोंदिया), रईसशेख चंद (टीव्ही ९, नाशिक) यांना 'सर्मथन मानवी हक्क वार्ता पुरस्कार २0१३'ने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच मुद्रित माध्यमातील अमोल सांबरे (दै. वार्ताहर, दै. नवाकाळ, ठाणे), भारत दाढेल (दै. लोकमत, नांदेड) यांना आपल्या लेखणीच्या माध्यमातून केलेल्या लिखाणास विशेष उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत. 

मुद्रित माध्यमांसाठी दोन व दृक्श्राव्य माध्यमासाठी तीन असे पाच पुरस्कार जाहीर करण्यात आले असून या पुरस्काराचे स्वरूप ५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. समाजातील उपेक्षित घटकांचे प्रतिबिंब राज्याच्या धोरणात उमटावे, या उद्देशाने सर्मथन गेली २0 वर्षे प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून विविध सामाजिक समस्यांना वाचा फोडून उपेक्षितांच्या मूलभूत हक्कांची जपणूक करणार्‍या ग्रामीण भागातील निर्भीड पत्रकारांचे मनोधैर्य उंचावण्याच्या उद्देशाने व त्यांना प्रोत्साहन देण्याच्या भावनेने सर्मथनतर्फे मागील १७ वर्षांपासून सर्मथन मानवी हक्क वार्ता पुरस्कार देण्यात येत आहे.