Tuesday 28 January 2014

१७ फेब्रुवारीला पत्रकार जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयांना घेराव घालणार

महाराष्ट्रात पत्रकारांवरील वाढते हल्ले आणि पत्रकार संरक्षण कायदा करण्यास सरकार करीत असलेली टाळाटाळ याचा निषेध कऱण्यासाठी आणि पत्रकारांच्या अन्य मागण्यांकडं सरकार आणि समाजाचं लक्ष वेधण्यासाठी महाराष्टातील पत्रकार येत्या 17 फेब्रुवारी 2014 रोजी जिल्हयाच्या ठिकाणी असलेल्या सर्व जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयांना घेराव करतील.या लढ्यात राज्यातील पत्रकार  आणि पत्रकारांच्या विविध संघटनांनी सहभागी व्हावं असं आवाहन पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केलं आहे.

समाज घडवण्यात पत्रकारांचा मोठा वाटा

मुंबई : चांगला समाज घडवायचा असेल तर प्रत्येकाने त्यासाठी झिजावे लागते. मात्र ती तयारी सध्या कोणाची नाही; परंतु तरीही ही जबाबदारी पत्रकारांवर येऊन ठेपते. समाज घडवण्यासाठी पत्रकारांचा मोठा वाटा आहे, असे मत मनसेचे उपविभागप्रमुख हेमंत कांबळे यांनी येथे व्यक्त केले. मनसे प्रभाग २५च्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वृतपत्र वाचनालयाचा ५वा वर्धापन दिन व स्थानिक पत्रकार लेखक यांचा सत्कार सोहळा रविवारी कांदिवली (पूर्व) येथे आयोजित केला होता. याप्रसंगी कांबळे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यकर्ता पडत-झडतच मोठा होत असतो. त्याला समजून घ्यायला हवे, असे म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांना मौलिक मार्गदर्शन केले. आमच्या विभागातील समस्या पत्रकार पोटतिडकीने मांडतात; पण त्यांनी यावरच न थांबता चांगला समाज घडवण्याची भूमिका घ्यावी, असे ते शेवटी म्हणाले.

Thursday 23 January 2014

बार व्यावसायिकाकडे खंडणी मागणाऱ्या दोन पत्रकारांना अटक

बार व्यावसायिकाकडे खंडणी मागणाऱ्या दोन पत्रकारांना मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे. तुषार कथारीया आणि वसिम खान अशी या पत्रकारांची नवे असून हे दोघे बॉम्बे प्रेस या साप्ताहिकाचे पत्रकार आहेत. 

Tuesday 21 January 2014

ज्येष्ठ पत्रकार डायस यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार व स्वातंत्र्यसैनिक फ्लाजीयान डायस यांचे रविवारी गोवा येथे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी व अन्य कुटुंबीय आहेत. डायस यांनी ४0 वर्षांहून अधिक वर्षे पत्रकारिता केली. मुंबईमध्ये 'फ्री प्रेस र्जनल'मधून त्यांनी पत्रकारितेस सुरुवात केली. त्या दरम्यान ते मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्यही होते. 

Monday 20 January 2014

ज्येष्ठ पत्रकार अशोक आचार्य यांचे निधन

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार अशोक आचार्य यांचे कांदिवली येथील निवासस्थानी शनिवारी रात्री झोपेतच निधन झाले. ते ८0 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात, दोन पुत्र, सून, नातवंडे असा परिवार आहे. औरंगाबाद येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून त्यांनी माध्यम क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर 'सकाळ' या दैनिकातून त्यांनी पत्रकारितेस प्रारंभ केला. १९६५ मध्ये 'महाराष्ट्र टाइम्स' सुरू झाल्यावर ते टाइम्स समूहात दाखल झाले. तब्बल ३३ वर्षांच्या तेथील पत्रकारिते मध्ये त्यांनी विधायक, सामाजिक व राजकीय वृत्तांकनावर विशेष भर दिला. १९९३ मध्ये 'मटा'च्या विशेष प्रतिनिधीपदावरून ते सेवानिवृत्त झाले. दै. 'लोकसत्ता'चे सहसंपादक संदीप आचार्य यांचे ते वडील होत.

Sunday 19 January 2014

पत्रकारांनी देश चालवण्याचा आव आणू नये - ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र

आपण देश, समाज चालवतो अशी मिजास पत्रकारांनी ठेऊ नये आपण समाजाचे सफाई कामगार आहोत. घाण दिसल्यावर चांगली बातमी मिळाल्यांचा आनंद न ठेवता काम चोखपणे करावे आपल्याला हात लावताना लोकांनी हजारदा विचार करावा अशी कामगिरी करुन पत्रकारांना कोणीही हात लावणार नाही या अर्थाने अस्पृश्य राहिले पाहिजे. मालकांच्या वृत्तीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होण्याचा धोका आहे, असे सडेतोड प्रतिपादन टाईम्स ऑफ इंडियाचे ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र यांनी मंत्रालय येथे केले. 

मनसे गटनेत्यावर पालिकेतील पत्रकारांचा बहिष्कार

मुंबई महानगर पालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नव्याने गटनेते बनलेले संदीप देशपांडे यांच्याकडून काही खास वृत्तवाहिन्यांचे व वृत्तपत्रांचे प्रतिनिधी यांनाच सतत बातम्या दिल्या जात असल्याने इतर वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रात काम करणाऱ्या पत्रकारांना देशपांडेच्या बातम्या का मिळत नाहीत अशी सतत कार्यालयातून विचारणा होत आहे. यामुळे कित्तेक पत्रकारांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tuesday 14 January 2014

टाइम्स नाऊ, इंडिया न्यूजवर युपी सरकारची अघोषित बंदी

कधी माध्यमकर्मीवर किंवा माध्यमांवर थेट हल्ले करायचे,कधी वृत्तपत्रांच्या जाहिराती बंद करायच्या,तर कधी माध्यमांवर वेगवेगळ्े दबाव आणून त्यांची कोंडी करायची हे असे वेगवेगळे फंडे आजमावत माध्यमांचा आवाज बंद करायचे मार्ग सर्रास सर्वत्र वापरले जातात.मात्र उत्तर प्रदेशच्या अखिलेश यादव सरकारने आता राज्यातील केबल ऑपरेटरवर दबाव आणि टाइम्स नाऊ आणि इंडिया न्यूज या इंग्रजी वाहिन्याचे प्रक्षेपण बंद करण्यास भाग पाडले आहे.त्यामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशात टाइम्स नाऊ आणि इंडिया न्यूज दिसत नाही अशी बातमी आज टाइम्स ऑफ ंइंडियानं दिली आहे. 

आप प्रमाणेच मनसेही आता उमेदवारी देताना माध्यमकर्मींचा विचार कऱणार

पत्रकारितेत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांना चांगले दिवस येऊ घातले आहेत असे दिसते.दिल्लीत केजरीवाल यानी दोन पत्रकारांना मंत्री केल्याने आणि आणखी काही पत्रकारांना आपचे सदस्य व्हायला निमंत्रित केल्याने देशातील पत्रकारांना राजकारणाबद्दल आकर्षण वाटायला लागले आहे.पत्रकारंाचा ओघ आप कडे लागला आहे.

Friday 10 January 2014

पत्रकारांनी कामगार कायद्यानुसार लढावे - माने

मुंबई : पत्रकारांवरील हल्ल्याच्या विरोधात संरक्षण कायदा, अर्धवेळ, कंत्राटी व असंघटित पत्रकार, नवृत्तीवेतनाच्या समस्या अशा अनेक अडचणी समोर आल्या आहेत. त्यामुळे सशक्त समाज निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या पत्रकारांनी आता स्वत: कामगार कायद्यानुसार न्यायासाठी लढले पाहिजे, असे आवाहन माजी आ.बाबुराव माने यांनी केले. भारतीय पत्रकार संघाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.

Tuesday 7 January 2014

पत्रकारांनी सकारात्मक आणि प्रेरणादायी लेखन करावे- राजेश टोपे

जालना : पत्रकार आपल्या लेखानातून समाजावर चांगला परिणाम करु शकतो. तेव्हा पत्रकारांनी समाजकारण, राजकारण आणि विकास कामांना प्रसिद्धीचे विषय बनवून सकारात्मक आणि प्रेरणादायी लेखन केल्यास इतरांना त्यातून प्रेरणा मिळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च वतंत्र शिक्षण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले. 

पत्रकारितेतील घटकांनी समीक्षकाची भूमिका बजावावी - राजीव जाधव

रत्नागिरी : पत्रकारांनी समाजातील घटनांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करुन समीक्षकाच्या भूमिकेतून त्या समाजापुढे मांडाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी केले. `दर्पण दिनानिमित्त` जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अल्पबचत भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे, रशीद साखरकर, राजेंद्र चव्हाण, शोभना कांबळे, दिपक पटवर्धन, धनश्री पालांडे, प्रमोद कोनकर, दत्तात्रय महाडिक आदी उपस्थित होते.


समाजाला विधायक दिशा देण्यात पत्रकारांचे महत्वपूर्ण योगदान - राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील

कोल्हापूर : समाजातील चांगल्या - वाईट बाबींचा सातत्याने पाठपुरावा करुन समाजहित साधण्याबरोबरच समाजाला विधायक दिशा देण्यात पत्रकारांचे महत्वपूर्ण योगदान आहे, असे प्रतिपादन बिहार राज्याचे राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी केले.

दसरा चौक येथील राजर्षी शाहू सभागृहात कोल्हापूर प्रेस क्लब यांच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने सन 2013 साठी देण्यात येणारे उत्कृष्ट पत्रकार, उत्कृष्ट छायाचित्रकार व उत्कृष्ट कॅमेरामन पुरस्कार अनुक्रमे बाबुराव रानगे, बी. डी. चेचर व रणजित बागल यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालिका श्रध्दा बेलसरे, डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील, कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष अनिल देशमुख, उपाध्यक्ष बाळासाहेब कोळेकर, श्री रवळनाथ को-ऑफ हौसिंग फायनान्स सोसायटी आजराचे अध्यक्ष एम. एल. चौगुले आदी उपस्थित होते.

राज्यपाल डॉ. पाटील म्हणाले, महाराष्ट्राचे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी आपल्या लेखनीतून समाज विकासासाठी चौफेर लिखाण केले व समाजातील प्रश्न ताकदीने मांडले. बाळशास्त्री जांभेकर यांचा हा वारसा आजच्या पत्रकार तेवढ्या ताकदीने पेलला आहे. आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. याला पत्रकारिताही अपवाद नाही. त्यामुळे नवनवीन विषय मांडणे महत्वाचे आहे. यासाठी पत्रकारांचे वाचन व चिंतन महत्वाचे आहे. त्याचबरोबरच सकारात्मक विचारातून ध्येयपूर्ती होत असते. हे सकारात्मक विचार पत्रकारितेतून सातत्याने समाजात रुजवायला हवेत.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची विधायक पत्रकारितेची भूमिका
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या संचालिका श्रध्दा बेलसरे म्हणाल्या, शासन आणि जनता यांच्यामधील समन्वयाचा दुवा म्हणून महाराष्ट्र शासनाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय कार्यरत आहे. शासनाचे निर्णय, कार्य व विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्वपूर्ण काम या विभागाव्दारे केले जाते. लोकराज्य, महान्यूज, जय महाराष्ट्र, दिलखुलास अशा शासकीय मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांव्दारे शासनाची भूमिका सातत्याने जनतेपर्यंत पोचविली जाते. या दृष्टीने विधायक अशा पत्रकारितेची भूमिका हे महासंचालनालय निभावत आहे. जनतेला उपलब्ध करुन देण्यासाठी ऐतिहासिक घडामोडीचे व राष्ट्रीय महापुरुषांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे आणि चित्रीकरणाचे जतन या विभागाव्दारे करण्यात आले आहे. याप्रसंगी कोल्हापूर माहिती विभागाच्या उपसंचालिका वर्षा शेडगे, कोल्हापूर प्रेस क्लबचे सचिव संभाजी गंडमाळे, प्रेस क्लबचे सदस्य, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गडचिरोली जिल्हा पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन साजरा

गडचिरोली : 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून जिल्हा पत्रकार संघ गडचिरोलीच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष कांतीभाई सूचक तर प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र गोटा हे उपस्थित होते. यावेळी साप्ताहिकचे संपादक केशवराव दशमुखे, नरेंद्र माहेश्वरी, मुनिश्वर बोरकर, गणपत वनीकर, भगवान गेडाम, अनुप मेश्राम, मुकुंदराव जोशी, नालंदा देशपांडे, रेखाताई वंजारी, बबन वडेट्टीवार, जय महाराष्ट्रचे जिल्हा प्रतिनिधी दुडूमवार, छायाचित्रकार विलास मेटे, युसीएनचे रुपराज वाकोडे, जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी प्रभाकर कोटरंगे, महादेव बसेना, नरेंद्र वाकडे, वासुदेव डोंगरे, आनंदराव नेवारे, कमलकिशेार मारोठे, गुरुदास गेडाम आदी उपस्थित होते. 

जिल्हा माहिती अधिकारी गोटा यांनी समाजातील प्रश्नांची नेमकी जाण ठेवून साक्षेपी पत्रकारिता करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधुना पत्रकार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी जिल्हा पत्रकार संघातर्फे जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र गोटा यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन साप्ताहिक वैनगंगा पुकारचे संपादक मुनिश्वर बोरकर केले. आभार साप्ताहिक गडचिरोली मार्गदिपचे संपादक गणपत वनीकर यांनी मानले.

पत्रकारांनी एकी बाळगावी - समाधान सावळे

बुलडाणा : पत्रकारांनी एकी बाळगली तर नव्याने विकासपर्व घडविता येईल, असे प्रतिपादन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष समाधान सावळे यांनी पत्रकार दिन कार्यक्रमात केले. जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा पत्रकार संघातर्फे आयोजित या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना सावळे बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

सकारात्मक पद्धतीने पत्रकारिता करणे आवश्यक आहे. जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांची भूमिका मोठी असून जबाबदारीने सर्वांनी काम करावे, असे आवाहन करुन सावळे म्हणाले, यापुढील काळात पत्रकारांसाठी कार्यशाळा, व्याख्यानमाला आयोजित करणे आणि पत्रकारांसाठी गृहनिर्माणाचा विषय याला प्राधान्य देऊन आपण काम करणार आहोत.

म्हाडाच्या माध्यमातून पत्रकारांसाठी घरे उपलब्ध करुन देण्याच्या कामाचा पाठपुरावा सुरु असून याकामी लक्ष दिले जाईल असे दैठणकर यांनी यावेळी सांगितले. पत्रकारांसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

दादासाहेब फाळके यांनी भारतात व मराठीत चित्रपट आणला. त्यावर मोठ्या उद्योगाची उभारणी झाली. त्याचप्रमाणे बाळशास्त्री जांभेकर यांच्यामुळे लाखोंना रोजगार मिळाला. म्हणूनच त्यांचे कार्यकर्तृत्व महत्त्वाचे ठरते. कधी व्रत असणारी पत्रकारिता आता व्यवसाय झाली असल्याने काळानुरुप बदल सर्वांनी स्वीकारला पाहिजे, असेही दैठणकर म्हणाले.

कार्यक्रमाचे संचालन देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र काळे यांनी केले. यावेळी साप्ताहिक विश्व बातमीचे संपादक विश्वनाथ माळी, दै. दिव्य मराठीचे प्रतिनिधी निलेश जोशी, दै. सकाळचे अरुन जैन, दै. लोकमतचे राजेश शेगोकार, हितवादचे राजेश डिडोळकर, बुलडाणा संघर्षचे सुभाष लहाणे, तरुण भारतचे नितीन शीरसाठ, दै. विश्वविजेताचे चंद्रकांत बर्दे, आकाशवाणीचे प्रतिनिधी जयकुमार दर्डा, गुड ईव्हिनिंग सिटीचे रणजीतसिंग राजपूत, रविकिरण टाकळकर, दै. जनमाध्यमचे भानुदास लकडे, दै. लोकसत्ताचे सोमनाथ सावळे, राजाभाऊ दवणे आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

यावेळी दै. भास्करचे विजय देशमुख, जाणकीराम लंबे, मातृभूमीचे प्रेमकुमार राठोड, स्टार माझा चे संदीप शुक्ला आदी पत्रकार तसेच जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी प्रकाश माळोदे, दिलीप काळे, विकास कुळकर्णी, श्रीदेवी कल्याणी, रमेश सापटे, विलास जाधव, विजय राठोड आदी उपस्थित होते.

मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

७/१/२०१४
मुंबई मराठी पत्रकार संघाद्वारे पत्रकार दिना निमित्त साप्ताहिक साधनाचे संपादक विनोद शिरसाट यांच्या हस्ते महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार नितीन चव्हाण, लोकसत्ताचे संजय बापट, साप्ताहिक चित्रलेखाचे स्तंभ लेखक जे.बी. शिंदे, जेष्ठ पत्रकार नीला उपाध्ये यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळा पत्रकार संघाचे देवदास मटाले अध्यक्षते खाली संपन्न झाला.

पत्रकारांनी दीपस्तंभाची भूमिका बजावावी



7/1/2014
नाशिक : नीतिमूल्ये, चारित्र्य याला खरी किंमत आहे. ती महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने जपली आहे आणि म्हणूनच गेल्या वर्षापेक्षा जास्त गुणवंतांना पुरस्कार दिले आहेत. पत्रकारांनी दीपस्तंभाप्रमाणे समाजाला मार्ग दाखवण्याची भूमिका बजावावी, असे उद्गार ज्येष्ठ पत्रकार, खासदार भरतकुमार राऊत यांनी नाशिक येथे पत्रकार दिन सोहळ्यात काढले. या वेळी भरतकुमार राऊत यांच्या हस्ते दै. 'पुण्य नगरी'चे स्तंभलेखक विजय सामंत यांना 'पत्रकार भूषण' पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर अनेक पत्रकारांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला. 

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, नाशिक शाखेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी नाशिक जिल्हाध्यक्ष महेंद्र देशपांडे, नाशिकचे महापौर यतीन वाघ, आमदार जयप्रकाश छाजेड, पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय भोकरे, मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष रमेश धोंगडे, सहकार महर्षी बाळासाहेब वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

अंबरिश मिश्र यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

7/1/2014
मुंबई : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार यंदा टाइम्स ऑफ इंडियाचे ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अंबरिश मिश्र यांना जाहीर झाला आहे. शाल, श्रीफळ, मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून लवकरच हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक आणि सुरेंद्र गांगण यांच्या समितीने ही निवड केली आहे. मिश्र यांचे वार्ताहर संघाने अभिनंदन केले आहे.

साप्ताहिक यशप्राप्तीचा वर्धापन दिन संपन्न

7/1/2014
मुंबई : भांडुप येथील यशप्राप्ती या साप्ताहिकाचा तिसरा वर्धापन दिन नुकताच दादर येथील स्वा. सावरकर सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात समाजसेवक रवींद्र पाटील, भारुडसम्राट लक्ष्मण राजगुरू, समाजसेवक डॉ. नंदकिशोर टेकवडे, पत्रकार शैलेश नागवेकर, समाजसेवक विजय पाटील, पत्रकार प्रशांत केणी, समाजसेवक देवलिंग जंगम गुरुजी, क्रीडा मार्गदर्शक उदय देशपांडे, समाजसेवक सुभाष कथोरे, लेखक अरुण देशमुख व सिनेकलाकार विनोद शिंदे अशा समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास यशप्राप्तीचे संपादक यशवंत पाटील, प्रदीप पानसांडे, जयंत जगताप, अशोक व्यास, विवेक मुनकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन आरजू स्वाभिमान नागरिक समिती यांनी केले.

Monday 6 January 2014

पत्रकार दिनाच्या मनःपूर्वक शूभेच्छा....


balshastri jambhekar

बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले, त्याचे नाव होते 'दर्पण', 

म्हणून 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.
-----------------------------------------------
पत्रकार मित्रांना पत्रकार दिनाच्या मनःपूर्वक शूभेच्छा...

Friday 3 January 2014

बेरक्याची दखल

3 / 1 / 2014
" रमेश सावंत नावाच्या भुरट्या पत्रकारावर कारवाही होणार = पोलिसात तक्रार दाखल " ही बातमी  बेरक्या http://berakya.blogspot.in/ या ब्लॉग वर तसेच फेसबुकवर  https://www.facebook.com/berkya.berkya प्रसिद्ध होताच सुजीत महामुनकर यांनी या बातमीची दखल घेतली जाईल अशी कमेंट टाकली आहे. सुजीत महामुनकर हे "मुंबई महानगर पालिका वार्ताहर संघाचे" अध्यक्ष असल्याचे समजतेवार्ताहर संघाला बेरक्याने जे आव्हान केले होते त्याची दखल वार्ताहर संघाने घेतली आहे असेच यावरुन स्पष्ट होत आहे. रमेश सावंत यांच्या सारखे कित्तेक भुरटे पत्रकार जनसंपर्क अधिकारयाच्या आशिर्वादाने पालिकेमधे वावरत आहेत. यापुढे अशा भुरट्या पत्रकाराना पालिकेत प्रवेश कसा मिळणार नाही यासाठी वार्ताहर संघाने प्रयत्न करण्याची गरज आहे.


Thursday 2 January 2014

रमेश सावंत नावाच्या भुरट्या पत्रकारावर कारवाही होणार

पोलिसात तक्रार दाखल 
2/12/2014
मुंबई महानगर पालिकेमध्ये दैनिक रत्नागिरी टाइम्सचा प्रतिनिधी असल्याचे सांगून गेले कित्तेक वर्षे रमेश सावंत नावाचा भुरटा पत्रकार पालिकेमध्ये वावरत होता. मुंबई मधील मोठ्या वृत्तपत्रांच्या पत्रकारांबरोबर नेहमी वावरणाऱ्या या सावंत नावाच्या पत्रकाराने रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पाचल विभागात राजापूर तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या नावाने पुरस्कार देण्याच्या नावाने पैसे वसुली सुरु केली होती. यासाठी मुंबई महानगर पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे, महापौर सुनील प्रभू इत्यादी मोठमोठ्या राजकारणी लोकांच्या नावाचा वापर सावंत याने केला होता. 

रमेश सावंत याला दैनिक रत्नागिरी टाइम्स मधून ५ वर्षापूर्वी काढून टाकले असताना पालिकेमधील जनसंपर्क अधिकारी याचा आशीर्वाद असल्याने गेले ५ वर्षे हा सावंत नावाचा भुरटा पत्रकार पालिकेच्या पत्रकार कक्षामध्ये बिनधास्त वावरत होता. राजापूर तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या पत्रकारांना रमेश सावंत यांच्या बाबत कहरी माहिती मिळताच त्यांनी याबाबत स्थानिक राजापूर पोलिस ठाण्यामध्ये लेखी तक्रार केली आहे. पोलिसांनी सावंत याला चौकशीसाठी बोलावले असता रमेश सावंतने राजापूर तालुक्यातून पळ काढून मुंबई गाठली आहे. दरम्यान मिळालेल्या माहिती नुसार ५ जानेवारीला रमेश सावंत याला पोलिसांनी चौकशी साठी बोलावले आहे. दैनिक रत्नागिरी टाइम्सचा प्रतिनिधी असल्याचे सांगणाऱ्या सावंत याला पोलिसांना खरी माहिती उपलब्ध झाल्याचे समजताच त्याने आता मी दैनिक पुढारी, पुण्या नगरीचा पत्रकार असल्याचे खोटे सांगण्यास सुरुवात केली आहे. 

रमेश सावंत यांच्या सारख्या भुरट्या पत्रकारांमुळे इतर पत्रकारांचे नाव बदनाम होत असल्याने राजापूर तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या पदाधिकारी आणि सभासदांनी जी भूमिका घेतली आहे त्याचे कौतुक करावेच लागेल.राजापूर तालुका ग्रामीण पत्रकार संघा प्रमाणेच मुंबई महानगर पालिकेमध्ये हा भुरटा पत्रकार वावरत असल्याने मुंबई महानगर पालिका वार्ताहर संघ आणि पालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून सुद्धा या भुरट्या पत्रकारावर कारवाही करण्याची गरज आहे.